Accident News : कर्नाळा खिंडीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, एक ठार तर ३२ गंभीर जखमी

Accident News : दहिसर ते सावंतवाडी मार्गावर धावणारी ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची बस पनवेल जवळील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या उतरणीवर कलंडल्यामुळे बसमधील ३२ प्रवासी जखमी झाले असून ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.
रविवारी उशीरा ही घटना घडली. रात्रीच्या वेळी जवळच्या गावकऱ्यांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अमोल कृष्णा तळवडेकर असे आहे.
अमोल हा राजापूर तालुक्यातील कोंडाये गावचा राहणारा होता. पनवेल तालुका पोलिसांनी बस अपघात करुन फरार झालेल्या बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
चालकाकडे पोलीस चौकशी करत आहेत. अमोल यांच्यासोबत त्यांची पावणेदोन वर्षांची भाची प्रवास करत होती. ती सुद्धा अपघातामध्ये जखमी झाली.





