पुणे | उपनगरीय भागात मुसळधार; हडपसर येथे सर्वाधिक २८ मिमी पावसाची नोंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. दुपारी तीननंतर काळे ढग दाटून आले आणि क्षणात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरवात झाली. शहराच्या उपनगरीय भागात मुसळधार पाऊस झाला, मध्यवर्ती भागात पावसाची एक सर आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आज दिवसभरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हडपसर येथे सर्वाधिक २८ मिमी पावसाची नोंद झाली.
उष्णतेचा पारा शहरात मागील दोन दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस पुन्हा दोन ते दिवस शहरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला होता. गुरूवारी (दि. १६) पहाटे उपनगरांसह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या एक ते दोन जोरदार सरी पडल्या. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक ७० मिमी पावसाची नोंद झाली. तर शिवाजीनगर परिसरात १३, लवळे येथे ७, पाषाण परिसरात ४, दौंड तालुक्यात ३.५, कोरेगांव पार्क येथे २ मिमी पावसाची नोंद झाली.
दुपारी चारच्या सुमारास काळे ढग दाटून येताच हडपसर, कोरेगांवपार्क, स्वारगेट, कोंढवा, मगरपट्टा यासह कात्रज, धनकवडी परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात हलक्या सरी पडल्या. कोथरूड, पाषाण, औंध, येरवडा, वारजे या परिसरातही पावसाने हजेरी लावली. यावेळी हडपसर, तळेगाव, मगरपट्टा आणि वडगावशेरी भागात वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
काही भागात झालेला पाऊस (सायंकाळपर्यंत)
हडपसर – २८, तळेगाव – १६, राजगुरूनगर – १५, मगरपट्टा – ९, चिंचवड – ७, वडगांवशेरी – ५, शिवाजीनगर – ४, पुरंदर – ३, खेड, कोरेगांव पार्क आणि लवळे – १ मिमी पावसाची नोंद झाली.





