SMAT 2024 : अभिषेक शर्माची विस्फोटक खेळी, सर्वात वेगवान शतकासह मोडित काढले अनेक विक्रम…

Syed Mushtaq Ali Trophy 2024 (Punjab vs Meghalaya) : आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीर अभिषेक शर्माची बॅट गेल्या काही दिवसांपासून शांत होती, मात्र सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट 2024 मध्ये त्याने मेघालयविरुद्ध अशी इनिंग खेळली की मैदानावर वादळ निर्माण झाले. आपल्या तूफानी शतकाच्या जोरावर अभिषेकने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आणि पंजाबला मेघालयवर 7 विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.
या सामन्यात मेघालयने पंजाबविरुद्ध प्रथम खेळताना 20 षटकांत 7 बाद 143 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात पंजाबने 9.3 षटकांत 3 बाद 144 धावा करून सामना जिंकला. यादरम्यान अभिषेकने 29 चेंडूत 11 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 106 धावांची खेळी केली. अभिषेक शर्माला त्याच्या या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
अभिषेकने ठोकले सर्वात वेगवान शतक…
पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माने मेघालय विरुद्ध 28 चेंडूत शतक झळकावले आणि भारतासाठी T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत तो उर्विल पटेलसह संयुक्तपणे पहिल्या क्रमाकांचा फलंदाज ठरला. दरम्यान, उर्विलने सय्यद मुश्ताक अली टूर्नामेंट 2024 मध्ये काही दिवसांपूर्वी 28 चेंडूत शतक झळकावले होते. उर्विल गुजरातकडून खेळतो. त्रिपुराविरुद्ध त्याने विक्रमी शतक झळकावले होते. टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारताचा दुसरा फलंदाज ऋषभ पंत आहे, ज्याने 32 चेंडूत हा पराक्रम केला होता तर रोहित शर्माने 35 चेंडूत ही कामगिरी केली आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय खेळाडूंचे सर्वात जलद T20 शतक
अभिषेक शर्मा – 28 चेंडू
उर्विल पटेल – 28 चेंडू
ऋषभ पंत – 32 चेंडू
रोहित शर्मा – 35 चेंडू
उर्विल पटेल – 36 चेंडू
#AbhishekSharma has registered the joint-fastest T20 hundred by an Indian, off 28 balls against Meghalaya 💥#SMAT2024 #SMAT #Punjab pic.twitter.com/xgqOSuH3C8
— Circle of Cricket (@circleofcricket) December 5, 2024
सूर्यकुमारला ‘या’ बाबतीत टाकले मागे…
अभिषेक शर्माने मेघालयविरुद्ध खेळताना 11 षटकार मारले आणि टी-20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला. 2024 मध्ये आतापर्यंत अभिषेकने 38 डावात 87 षटकार मारले आहेत, तर 2022 मध्ये सूर्यकुमारने 41 डावात 85 षटकार लगावले होते.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज
87 षटकार (38 डाव) – अभिषेक शर्मा (2024)
85 षटकार (41 डाव) – सूर्यकुमार यादव (2022)
71 षटकार (33 डाव) – सूर्यकुमार यादव (2023)
66 षटकार (31 डाव) – ऋषभ पंत (2018)
63 षटकार (42 डाव) – श्रेयस अय्यर (2019)
60 षटकार (32 डाव) – संजू सॅमसन (2024)





