Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माच्या शिरपेचात ‘लाजिरवाणा’ तुरा! रोहित-संजूला मागे टाकत बनला ‘डक किंग’
Abhishek Sharma Record : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने कर्णधार इशान किशनच्या वादळी खेळीच्या जोरावर २१६ धावांचा डोंगर उभारला.

Abhishek Sharma Most Ducks Record 2026 : आयपीएल २०२६ च्या २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील लढतीत एका अनपेक्षित विक्रमाची नोंद झाली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सामन्यात हैदराबादचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची भर पडली आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सर्वांच्या नजरा हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीवर होत्या. मात्र, सामन्याच्या पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने आपल्या भेदक गोलंदाजीने अभिषेकला चकवले. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अभिषेक डीप थर्ड मॅनला झेल देऊन ‘गोल्डन डक’चा शिकार ठरला. या शून्यामुळे अभिषेकने भारतीय क्रिकेटमधील एका अतिशय खराब विक्रमाला गवसणी घातली आहे.
रोहित शर्मा आणि संजू सॅमसनला टाकलं मागे –
This version of Jofra Archer gives me the vibe of Prime Bumrah. In this IPL he took the wickets of Rickleton, Phil Salt and Abhishek Sharma in the first over.
people trolled him for missing the IPL , but now he came back with statement.pic.twitter.com/Grz5YQQrpj
— Soman. (@Shreyasian96) April 13, 2026
अभिषेक शर्मा आता टी-२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. २०२६ या वर्षात त्याने १८ सामन्यांपैकी तब्बल ७ वेळा खाते न उघडता तंबूचा रस्ता धरला आहे. यापूर्वी हा विक्रम संयुक्तपणे रोहित शर्मा (६ वेळा, २०१८) आणि संजू सॅमसन (६ वेळा, २०२४) यांच्या नावावर होता. अभिषेकने या दोघांनाही मागे टाकत या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
क्रमांक १ च्या फलंदाजाची घसरण –
विशेष म्हणजे आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्मासाठी २०२६ हे वर्ष एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरत आहे. या वर्षात खेळलेल्या १८ डावांमध्ये त्याने २६.५८ च्या सरासरीने केवळ ४५२ धावा केल्या आहेत. टी-२० वर्ल्ड कपपासून त्याच्या फॉर्ममध्ये झालेली घसरण अजूनही कायम असून, ७ पैकी ४ वेळा तो पहिल्याच चेंडूवर (Golden Duck) बाद झाला आहे. या कामगिरीमुळे हैदराबादच्या सलामीच्या जोडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.





