Abhishek Sharma Injured : टीम इंडियाला हरारेत मोठा झटका! अभिषेक शर्माला अचानक सोडावं लागलं मैदान; नेमकं कारण काय?
Abhishek Sharma Injured : भारताचा २५ वर्षीय स्फोटक डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला आहे.

Abhishek Sharma Finger Injury IND vs ZIM 1st T20I Harare Updates : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे सुरू असलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान भारतीय संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा २५ वर्षीय स्फोटक डावखुरा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला आहे. दुखापत इतकी गंभीर होती की त्याला तातडीने मैदान सोडून वैद्यकीय उपचारासाठी ड्रेसिंग रूममध्ये परतावे लागले.
कॅच पकडताना बोटाला झाली दुखापत –
ही दुर्दैवी घटना झिम्बाब्वेच्या डावादरम्यान घडली. झिम्बाब्वेचा फलंदाज डीओन मायर्स याने मारलेला एक फटका बॅकवर्ड पॉईंटला झेल घेण्याच्या प्रयत्नात अभिषेककडून चेंडू सुटला. मात्र, हा वेगवान चेंडू पकडताना त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. वेदनेने विव्हळत असलेल्या अभिषेकला संघ व्यवस्थापनाने तातडीने मैदानाबाहेर नेले असून वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे.
खडतर इंग्लंड दौऱ्यानंतर पुन्हा नवं संकट!
INJURY BLOW: Abhishek Sharma walks off from the field as ball hits on his right hand.
– Bad signs for Team India. pic.twitter.com/AF9n7cLzg9
— Maina Singh (@Maina_Singhx77) July 23, 2026
अभिषेक शर्मासाठी हा काळ काहीसा कठीण सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात, जिथे भारताचा ०-४ असा पराभव झाला, तिथे अभिषेकची बॅट फारशी तळपली नव्हती. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते, मात्र त्यानंतर संपूर्ण मालिकेत त्याची कामगिरी खालावली होती. त्यामुळे या झिम्बाब्वे दौऱ्यात तो फॉर्मात परतण्यासाठी सज्ज झाला होता, पण पहिल्याच सामन्यात दुखापतीने घात केला.
२०२६ चा वर्ल्डकप हिरो; हरारे मैदान आहे खास –
झिम्बाब्वेचे हरारे मैदान अभिषेकसाठी अत्यंत भावनिक आणि खास आहे, कारण २०२४ मध्ये याच मैदानावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिथे त्याने ५ डावांत १७४.६४ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने १२४ धावा कुटल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय टी-२० संघात आपले स्थान पक्के केले आणि २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कप विजेतेपदातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





