Arun Doping Shock : ग्लास्गोत तिरंगा फडकण्यापूर्वीच मोठी नामुष्की! भारताचा चॅम्पियन खेळाडू डोप चाचणीत ‘दोषी’; राष्ट्रकुल संघातून थेट हकालपट्टी
Arun Doping Shock : भारताचा अव्वल आणि आश्वासक ज्युडोपटू अरुण कुमार डोप चाचणीत दोषी आढळला आहे.

Arun Kumar Doping Test Positive Glasgow Commonwealth Games 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Glasgow Commonwealth Games 2026) तोंडावर भारतीय क्रीडा जगताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अव्वल आणि आश्वासक ज्युडोपटू अरुण कुमार (Arun Kumar) डोप चाचणीत (Doping Test) दोषी आढळला आहे. या गंभीर प्रकारानंतर त्याला भारतीय संघातून तातडीने बाहेर काढण्यात आले असून, तो आता राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाचे (JFI) अध्यक्ष मुकेश कुमार यांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे.
७३ किलो वजनी गटात पदकाचा होता प्रबळ दावेदार!
पुरुष ७३ किलो वजनी गटात अरुण कुमार भारतासाठी पदकाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. ‘इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स’ (IIS) मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या अरुणने ज्युनियरपासून सिनियर स्तरापर्यंत सातत्याने चमकदार कामगिरी केली होती. २०२३ च्या मकाऊ ज्युनियर आशियाई चषकात सुवर्णपदक जिंकून तो प्रथम चर्चेत आला होता. त्याच्या नमुन्यात नेमका कोणता प्रतिबंधित पदार्थ आढळला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
२०२५ आणि २०२६ मधील सुवर्णकाळ अन् दुर्दैवी शेवट!
🚨 Doping setback for India 🚨
Judoka Arun Kumar (73kg) who was selected for Commonwealth Games has tested positive for a banned substance and will not travel to Glasgow.
JFI President Mukesh Kumar confirmed the development.
Info – @g_rajaraman pic.twitter.com/Gax6KGbmi6
— RevSportz Global (@RevSportzGlobal) July 23, 2026
अरुणने २०२५ मध्ये तैपेई आशियाई ओपन स्पर्धेत सुवर्णपदक, तर हाँगकाँग आशियाई ओपनमध्ये कांस्यपदक जिंकून आशियाई ज्युडो सर्किटवर स्वतःचे वर्चस्व निर्माण केले होते. २०२६ मधील प्रतिष्ठित ताश्कंद ग्रँड स्लॅममध्ये सातवे स्थान पटकावून त्याने आपली क्षमता सिद्ध केली होती. याच उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याला ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकीट मिळाले होते.
मात्र, ऐन स्पर्धेच्या तोंडावर डोपिंगच्या जाळ्यात अडकल्यामुळे त्याचे आणि भारताचे पदकाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.





