इंडिया आघाडीतून आप बाहेर ! कॉंग्रेसच्या नेतृत्वावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली – राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतून आम आदमी पक्ष (आप) अखेर बाहेर पडला. विरोधकांच्या आघाडीचा भाग नसल्याचे त्या पक्षाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, आघाडीचे नेतृत्व करण्याच्या कॉंग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याआधी इंडिया आघाडीने शनिवारी सायंकाळी बैठक बोलावली आहे.
ऑनलाईन स्वरूपात ती बैठक होणार आहे. संसदेतील विरोधकांची रणनीती ठरवण्याबरोबरच देशातील राजकीय स्थितीवर संयुक्त चर्चा करण्याच्या दृष्टीने त्या बैठकीचे महत्व वाढले आहे. त्यातून मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटत असल्याचे मानले गेले. मात्र, आपने इंडिया आघाडीपासून फारकत घेतल्याने विरोधकांमधील फाटाफुटीचे चित्र समोर आले.
इंडिया आघाडीची व्यवस्था केवळ लोकसभा निवडणुकीपुरती होती, अशी भूमिका मागील काही काळापासून आपकडून मांडली जात होती. आता आणखी पुढे जात त्या पक्षाने एकप्रकारे आघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब केले. आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पक्षाची भूमिका जाहीर केली.
आप आता इंडिया आघाडीचा भाग नसल्याचे त्यांनी म्हटले. ती आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचे आपने याआधीच स्पष्ट केले. त्या निवडणुकीनंतर हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांत आम्ही स्वबळावर लढलो. बिहारमधील आगामी निवडणुकही आम्ही एकट्याच्या बळावर लढू. पंजाब आणि गुजरातमधील पोटनिवडणुकांनाही आप स्वतंत्रपणे सामोरा गेला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आघाडीचे नेतृत्व म्हणजे पोरखेळ नसल्याचे म्हणत सिंह यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची कुठली बैठक बोलावण्यात आली का? आघाडीच्या विस्तारासाठी एखादे पाऊल उचलले गेले का? कधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर कधी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर त्यांच्याकडून टीका केली जाते.
आघाडीत एकजूट असायला हवी होती. कॉंग्रेस हा आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष आहे. पण, विरोधकांच्या ऐक्यासाठी त्या पक्षाने कुठली भूमिका निभावली का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. त्यातून कॉंग्रेस आणि आपमधील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले असल्याचे दिसून येत आहे.
तृणमूल बैठकीत होणार सहभागी
ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसच्या गोटातूनही याआधी इंडिया आघाडीच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तो पक्ष आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले. ममतांचे खासदार भाचे अभिषेक बॅनर्जी ऑनलाईन बैठकीत तृणमूलचे प्रतिनिधित्व करणार आहेत.





