कराड (प्रतिनिधी) :– जुळेवाडी (ता. कराड) येथे वाढदिवस साजरा होत असताना एका युवकाचा धारदार कोयत्याने वार करुन खून झाला. वाढदिवस साजरा होत असताना घडलेल्या धक्कादायक घटनेने जुळेवाडीसह रेठरे बुद्रुक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी (दि.26 रोजी) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेतील संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी खून झालेल्या युवकाच्या आईने पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राजवर्धन महादेव पाटील (वय 24, रा. जुळेवाडी ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जुळेवाडी येथे शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असताना राजवर्धन पाटील याच्यावर खुनी हल्ला झाला.
धारदार कोयत्याने वार करुन त्याचा खून झाला. या हल्ल्यातील संशयित विजय बाबुराव काशीद फरारी आहे. या खुनी हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.