प्रभात वृत्तसेवा पिंपरी – केवळ पन्नास रुपये न दिल्याने एका तरुणाला बोथट चाकूने मारून जखमी केले. उपचारादरम्यान त्या जखमी व्यक्तीचा २५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ही घटना दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी खुर्द परिसरात उघडकीस आली.शुभम सखाराम पवार (वय २४, रा. सातकर स्थान, चंद्रमा गार्डन जवळ, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मोहम्मद नसीम मोहम्मद कलाम शाह (वय ४२, रा. वाकी खुर्द, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल मोहम्मद कलाम कयुम शाह (वय ७३) यांनी दि. १९ ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सोळंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद कलाम शाह यांचे वाकी गावातील हद्दीत एमपी पेट्रोलपंप जवळ टायर पंक्चरचे दुकान वजा टपारी आहे. दि. १९ रोजी पहाटे चार ते साडेसातच्या दरम्यान त्यांचा मुलगा मोहम्मद नसीम शाह हा टपरीत झोपला होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी शुभम पवार याने मयत मोहम्मद नसीम शाह यांच्याकडे नशेसाठी पन्नास रुपयांची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याने रागावल्यानंतर त्याने बोथट चाकूने मारहाण करीत नसीम शाह यांना गंभीर जखमी केले. जखमी मोहम्मद नसीम शाह यांना पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान दि. २५ रोजी त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या उघड होताच चाकण पोलीस तपासासाठी उतरले आणि आरोपी शुभम पवार याला निश्चित करून अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने हल्ल्याची कबुली दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली. या प्रकरणात पोलीसांनी गुन्ह्याच्या कलमांमध्ये वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल केला असून, चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.