प्रभात वृत्तसेवा पुणे – स्कुटरचा धक्का लागल्यावरुन झालेल्या वादात एका तरुणाचा घरी घुसून खून करण्यात आला. फरार आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली.याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे म्हणाले की, शुक्रवारी सायंकाळी कोरेगाव येथील यशईन चौकात मोहम्मद शकील मोहम्मद हाजी आणि त्याचा भाऊ सिद्दीकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी यांना स्कुटीवरील ओंकार वाळके आणि साथीदाराने धक्का दिला. यावरून झालेल्या किरकोळ वादाचा राग आरोपींनी मनात धरला. यानंतर शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास ओंकार वाळके व साथीदार हे दोघा भावांच्या राहत्या घरी गेले. त्यांनी लाकडी दांडके, प्लास्टिक पाइप आणि हाताने मारहाण केली. यात सिद्दीकी मोहम्मद गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. त्याचा भाऊ शकील याला गंभीर दुखापत झाली. जखमी शकीलच्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी गुन्ह्यानंतर फरार झाले होते. तातडीने शोधमोहीम राबवून ओंकार सिताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगधने (दोघेही रा. कोरेगाव, ता. शिरूर) यांना अवघ्या दोन तासांत अटक केली.