Ozar : आईच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
Ozar : या उपक्रमासाठी वैज्ञानिक व्याख्याते रतिलाल बाबेल (जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष) आणि तानाजी वामन (माजी उपाध्यक्ष) उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक प्रयोगांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

ओझर : स्व. विमल मारुती थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या स्मृती जपतानाच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी आणि प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान समजावे, या उद्देशाने बुधवारी (दि. 25) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक येथे वैज्ञानिक व्याख्यान व प्रयोगांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमासाठी वैज्ञानिक व्याख्याते रतिलाल बाबेल (जुन्नर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष) आणि तानाजी वामन (माजी उपाध्यक्ष) उपस्थित होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक प्रयोगांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विज्ञानातील संकल्पना, महान वैज्ञानिकांचे कार्य आणि त्यांचे संशोधन विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आले. तसेच वैज्ञानिक व गणितीय कोडी, आकृत्या आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविण्यात आली. सुमारे दोन तास विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी रतिलाल बाबेल यांनी महान वैज्ञानिकांचे कार्य, त्यांचे योगदान आणि आईचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे, निरीक्षणशक्ती वाढविणे आणि चिकित्सक विचारांना चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनात अॅड. वैभव थोरात, बबनराव थोरात, अविनाश नायकोडी आणि दामू नाना मोरे यांनी विशेष सहभाग घेतला.
यावेळी सुनील विधाट, सचिन थोरवे, शिरोलीच्या उपसरपंच वैशालीताई थोरवे तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भीमसेन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष देवकुळे आणि पर्यवेक्षक राजकुमार गंभीर यांनी केले. प्रियांका पादिर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तुकाराम निधन यांनी सूत्रसंचालन केले, तर संतोष देवकुळे यांनी आभार मानले.





