सोमोलियाच्या राजधानीतल्या हॉटेलवर दहशतवादी हल्ला

मोगादिशू, (सोमालिया) – सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या किनारपट्टीच्या भागातील एका हॉटेलवर आज सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी हॉटेलच्या परिसरात धाव घेतली. हॉटेलच्या परिसरातून गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते, असे काही साक्षीदारांनी सांगितले. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना ठार केल्याचे सोमाली नॅशनल न्यूज एजन्सी या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
या हल्ल्यात नक्की किती जण ठार झाले आणि किती जण जखमी झाले, हे निश्चितपणे समजू शकलेले नाही. अल-कायदाशी संबंधित पूर्व आशियातील दहशतवादी संघटना अल-शबाब ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्या संघटनेच्या सदस्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचे अल-शबाबने रेडिओवर म्हटले आहे.
लोक आपल्या आठवड्याची सुटी घालवण्यासाठी लिडो बीच येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे हा भाग आठवड्याच्या शेवटी गजबजलेला असतो. येथेच शुक्रवारी रात्री हा हल्ला झाला. या हॉटेलसमोरच आत्मघातकी जॅकेट घातलेल्या एका हल्लेखोराने स्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले, असे एका प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले.
या हल्लेखोराबरोबर आलेले त्याचे साथीदार चकमकीमध्ये मारले गेले किंवा जखमी झाले. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये अनेक जण जमिनीवर पडलेले दिसले. त्यांना उचलून रुग्णालयात पोचवले गेले, असे एका अन्य साक्षीदाराने सांगितले. लिडो बीच या हॉटेलवर पूर्वीही अल-शबाबशी संबंधित दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सर्वात शेवटी मे महिन्यात झालेल्या हल्ल्यात ९ जण ठार झाले होते.





