IND vs NZ 2nd Test : वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचं लोटांगण, किवींचा पहिला डाव 259 वर आटोपला….

IND vs NZ 2nd Test (New Zealand 1st Inning) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून पुण्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय योग्य ठरला नाही आणि संघ 259 धावांवरच मर्यादित राहिला. प्रदीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने 7 विकेट घेत न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. तर आर अश्विनने 3 बळी घेतले. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 76 धावांची खेळी खेळली तर रचिन रवींद्रने 65 धावांचे योगदान दिले.
Innings Break!
Superb bowling display from #TeamIndia! 💪
7⃣ wickets for Washington Sundar
3⃣ wickets for R AshwinScorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @Sundarwashi5 | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/TsWb5o07th
— BCCI (@BCCI) October 24, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. 32 धावसंख्येवर संघाने पहिली विकेट गमावली. टॉम लॅथम 15 धावा करून अश्विनचा बळी ठरला. यानंतर अश्विनने विल यंगला देखील माघारी धाडलं . विल 18 धावा करून बाद झाला. यानंतर अश्विनने कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. कॉनवे 141 चेंडूत 76 धावा करून बाद झाला.
यानंतर न्यूझीलंड संघाने दमदार पुनरागमन केले. किवी संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यात 197 धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि ते मोठ्या धावसंख्येकडे जोरदार वाटचाल करत होते, पण यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरने कहरच केला आणि सलग तीन षटकांत तीन बळी घेत त्याने न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली.
सुंदरने आधी रचिन रवींद्र (65), नंतर टॉम ब्लंडेल (3) आणि त्यानंतर डॅरिल मिशेल (18) यांना आपला बळी बनवले. यानंतर त्याने ग्लेन फिलिप्स (9), टीम साऊदी (5), एजाज पटेल (4), मिचेल सँटनर (33) यांना आपले बळी बनवले आणि न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला.





