भरधाव कंटेनरने वाहतूक पोलिसाला चिरडले; कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा जागीच मृत्यू

Accident News : मंगळवारी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर पुणे जिल्ह्यातील कार्ला फाटा येथे कंटेनरने चिरडल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून चाकणच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या मिथुन धेंडे( 38 वर्षे) यांना चिरडले.
या अपघाताच्या घडनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दुसऱ्या म्हणेजच आज १४ मे रोजी त्यांचा वाढदिवस होता. या घटनेमुळे धेंडे कुटुंबीय शोकसागरात बुडाले असून नातेवाई, मित्र परिवार आणि पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १४ मे रोजी साधारण ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने धेंडे यांना चिरडले. हा कंटेनर मुंबईकडून चाकणच्या दिशेने जात होता. कार्ला फाटा येथे कंटेनर अत्यंत वेगात होता. याचा व्हिडिओ काढून एका तरूणाने पोलिसांना कळवले.
त्यानुसार पुणे ग्रामीण कंट्रोल रूमने कंटेनर थांबवण्याचे आदेश दिले. कर्तव्यावर असणाऱ्या मिथुन धेंडे हे वाहतूक नियमन करत असताना भरधाव कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला. वडगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार कंटेनर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
सदर अपघाताचा तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी भेट दिली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. संबंधित कंटेनर चालकास लवकरात लवकर पकडून कठोरातील कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी होत आहे.





