Actor Aasif Khan quits smoking: ‘पंचायत’ वेब सीरिजमधील आपल्या प्रभावी अभिनयामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता आसिफ खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही आठवड्यांपूर्वी त्याची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची तब्येत सुधारत असून, त्यानं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे धूम्रपान सोडण्याचा. आसिफनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यानं सांगितलं की, त्याला सिगरेट सोडून २१ दिवस झाले आहेत. “लोक म्हणतात की २१ दिवसात कोणतीही सवय बदलता येते, आणि आज मला सिगरेट सोडून २१ दिवस झाले. आज फ्रेंडशिप डे आहे आणि मला वाटतं, माझ्या मित्रांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी याहून चांगला दिवस नाही,” असं तो म्हणाला. आसिफनं पुढे चाहत्यांना सल्ला देताना लिहिलं की, “रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपल्या आरोग्याशी खेळू नका. आपल्या चुकांची जाणीव करण्यासाठी किंवा योग्य लोक ओळखण्यासाठी हॉस्पिटलच्या बेडची वाट पाहू नका. या मोठ्या शहरांमधल्या गोंधळात हरवू नका. आपला साधेपणा, नम्रता आणि खरी ओळख जपून ठेवा.” त्याच्या या सकारात्मक निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे. अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देत, आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, ‘पंचायत’ सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये आसिफची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवली होती. त्याच्या भूमिकेची उणीव अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती. चाहत्यांच्या मनात त्याचं स्थान कायम असल्याचं या प्रतिक्रियांवरून दिसून येतं.