मुंबई : प्राइम व्हिडिओवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’ मधील ‘दामाद जी’च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेले अभिनेता आसिफ खान यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. आसिफ यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. आसिफ यांनी इन्स्टाग्रामवर दोन स्टोरीज शेअर केल्या. पहिल्या स्टोरीत रुग्णालयातील छताचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, “गेल्या 36 तासांपासून हे पाहिल्यावर लक्षात आले की, आयुष्य खूप छोटे आहे. एकही दिवस गृहीत धरू नये. एका क्षणात सर्व काही बदलू शकते. आपल्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहा.” दुसऱ्या स्टोरीत त्यांनी लिहिले, “आपल्यासाठी कोण महत्त्वाचे आहे, हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्यांचा सन्मान करा. आयुष्य ही एक देणगी आहे, आणि आपण धन्य आहोत.” ‘पंचायत’मधील नखरेल्या जावयाच्या भूमिकेने आसिफ यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. ‘पाताल लोक’, ‘मिर्जापुर’, ‘जम्तारा’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. हृदयविकाराच्या बातमीने चाहते चिंताग्रस्त झाले असून, त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. राजस्थानच्या छोट्या गावात जन्मलेल्या आसिफ यांनी अभिनयात यश मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, त्यांनी पार्ट्यांमध्ये वेटरचे काम केले आणि ‘पंचायत’मधील भूमिकेसाठी सुरुवातीला निवडले जाण्याची इच्छा नव्हती. मात्र, नशीबाने त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी ती सार्थकी लावली.