Pune District : चाकणच्या वाहतूक समस्येवर उपाय की आश्वासनांचा पाऊस?
Pune District : चाकणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी बाह्यवळण मार्गांची योजना अनेक वर्षांपासून चर्चेत आहे.

चाकण : पुणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारे औद्योगिक शहर म्हणून चाकणची ओळख निर्माण झाली आहे. देश-विदेशातील मोठ्या कंपन्या, कारखाने आणि गोदामांमुळे औद्योगिक विस्ताराला वेग आला; मात्र या विकासाची दुसरी बाजू चाकणकरांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. वाढती वाहनसंख्या, अवजड वाहनांची गर्दी, खड्डेमय रस्ते, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे आणि अपुरे वाहतूक नियोजन यामुळे चाकणमध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपायांच्या घोषणा, बैठका आणि आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्ष रस्त्यावर परिस्थिती फारशी बदललेली नसल्याने ‘चाकणची वाहतूक कोंडी सुटणार तरी कधी?’ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
चाकणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी बाह्यवळण मार्गांची योजना अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. नाणेकरवाडी, कडाचीवाडी आणि मेदनकरवाडी आदी भागांतील भूसंपादनाबाबत शासनाच्या नोंदी व प्रक्रिया झाल्याचे सांगण्यात येते. तसेच चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चार पर्यायी बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात येते. मात्र प्रस्ताव, भूसंपादन आणि प्रक्रिया यापुढे प्रत्यक्ष रस्त्याचे काम कधी सुरू होणार, हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे नागरिकांचा सवाल सरळ आहे-रस्ते कधी होणार आणि कोंडी कधी कमी होणार?
चाकणच्या वाहतूक समस्येवर प्रशासनाच्या पातळीवर अलीकडच्या काळात अनेक बैठका झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि इतर पायाभूत सुविधांबाबत विशेष बैठक घेण्यात आली. त्यात रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे, पार्किंग आणि अन्य समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कृती आराखडाही तयार करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही चाकण परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण या समस्यांवर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. औद्योगिक कंपन्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करून वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा मुद्दाही पुढे आला आहे. मात्र बैठका वाढत आहेत, आदेश निघत आहेत; तरी रस्त्यावरची कोंडी किती कमी झाली, याचे ठोस उत्तर नागरिकांना अद्याप मिळालेले नाही.
खड्डे, पार्किंग आणि अतिक्रमणांचीही कोंडी
चाकणच्या वाहतूक कोंडीमागे केवळ वाहनांची संख्या हे एकमेव कारण नाही. रस्त्यांवरील खड्डे, रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत पार्किंग, अतिक्रमणे, अपुरी पावसाळी पाणी निचरा व्यवस्था आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची अपुरी व्यवस्था यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून रस्ते दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त 100 सुरक्षा जवानांची नियुक्ती तसेच रस्ते दुरुस्तीला मुदत देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र या उपाययोजनांची परिणामकारकता प्रत्यक्ष रस्त्यावर दिसणे आवश्यक आहे.
आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार!
चाकण औद्योगिक परिसरातील सुमारे 500 किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करून वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची योजना पुढे आली आहे. सीसीटीव्ही आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर स्वागतार्ह असला, तरी नागरिकांचा प्रश्न त्याहून मूलभूत आहे-कृत्रिम बुद्धिमत्ता येण्यापूर्वी रस्ते तरी व्यवस्थित करा! वाहतूक नियमनासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभी केली, तरी वाहनांसाठी रस्त्यावर पुरेशी जागाच नसेल, तर कोंडीचा प्रश्न कितपत सुटणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
उद्योग वाढले; पायाभूत सुविधा मात्र मागे
चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झपाट्याने झाला. मोठ्या कंपन्यांनी या परिसरात गुंतवणूक केली आणि रोजगाराच्या संधी वाढल्या. मात्र उद्योगांच्या वाढीच्या तुलनेत रस्ते, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विकास पुरेसा झाला नसल्याची भावना नागरिक आणि उद्योजकांमध्ये आहे. चाकणमधील पायाभूत सुविधांचा अभाव आणि वाहतूक कोंडीमुळे काही उद्योजकांनी स्थलांतराचा इशारा दिल्याचेही अलीकडे समोर आले. त्यानंतर चाकणमध्येच एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





