“बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर…”; निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मनसेचे ट्वीट

Ajit Pawar – केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात अनपेक्षित निकाल देताना शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का देताना अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय देण्यास सांगितले आहे. त्यासाठी शरद पवार यांना 7 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेची वेळ देण्यात आली आहे. या निकालावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने X अकाउंटवरुन केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.
मनसेचा अधिकृत पेजवरून राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर रत्नागिरीतील सभेतून केलेला टीकेच्या व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर मनसेने अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मनसेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!’
बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी ‘राज ठाकरे’ यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते… असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ !… pic.twitter.com/qg916aUC3y
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 6, 2024
सोबतच मनसेच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर राज ठाकरेंचा आणखी व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “काका – पुतण्यांमधला ओलावा… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात, असे व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. “‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? “असा सवाल मनसेने केला आहे. यात अजित पवारांसोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का?
वाह रे पट्ठ्या…! 🤨 pic.twitter.com/ZXcOk6y6oy
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
शरद पवार गटासमोर मोठे आव्हान
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. जे नाव आणि चिन्ह दिले जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान शरद पवार गटासमोर आहे.
काका – पुतण्यांमधला ओलावा… 🧡काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात ! #बाळासाहेबठाकरे #राजसाहेबठाकरे pic.twitter.com/3cKWxoVCPB
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 7, 2024
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
– अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे
– पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील
– दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने
– ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिले
– उद्या ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचवावे
– पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत.
अजित पवार यांचा राष्ट्रवादीत बहुमत असल्याचा दावा
२ जुलै २०२३ रोजी अजित पवार राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सामील झाले. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बहुमत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर त्यांचा अधिकार आहे.
अजित पवार यांनी २० जून रोजी निवडणूक आयोगात याचिका दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला होता आणि निवडणूक आयोगासमोर नऊ हजारांहून अधिक कागदपत्रे सादर केली होती. दुसरीकडे शरद पवार यांनी पक्ष सोडलेल्या ९ मंत्र्यांसह ३१ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती.





