Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट? मुख्यमंत्र्यानंतर आता जयंत पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; शरद पवारांचा विश्वासू नेताही सोबत
Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत सहभाही होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Jayant Patil met Eknath Shinde : शरद पवार गटाचे नेते राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी जाऊन काल रात्री भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात मोठं काहीतरी घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली आहे. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत सहभाही होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा केवळ मीडियामध्येच आहे असे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. मात्र, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण त्यांच्या मतदारसंघातील ईश्वरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष अपात्रतेचा विषय असल्याचा खुलासा केला होता.
दोघांमध्येच बंद दाराआड अर्धा तास चर्चा
नंदनवन येथे झालेल्या बैठकीत या दोन्ही नेत्यांशिवाय शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थिती होते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येच बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
फडणवीस-शिंदे यांच्या वक्तव्याची चर्चा
दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार एकनाथ शिंदे पाहतील तर देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशी चर्चा आहे. या चर्चेवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही दिल्लीला जाणार का? असा प्रश्न प्रसार माध्यमांतून विचारण्यात आला. यावर त्यांनी ‘मी कालच दिल्लीला जाऊन आलो’ असे मिश्कलपणे उत्तर दिलं. एकनाथ शिंदे यांना ‘तुम्ही मुख्यमंत्री होणार का’, असा प्रश्न माध्यमांतून विचारण्यात आला. यावर, ‘मुख्यमंत्रिपदाची व्हॅकन्सी आहे का’ असा सवाल त्यांनी केला. यामुळे एकच हशा पिकला.






