Pune District : ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी दिशा
Pune District : बदलत्या काळात ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, उत्पादनवाढ, साखर उतारा सुधारणा, मृदा व्यवस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

इंदापूर : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ऊस शेती अधिक उत्पादक, शाश्वत आणि स्पर्धात्मक करण्याच्या उद्देशाने निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने “ऊस पीक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान” या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन सोमवारी (दि. २७) दुपारी १. ३० वाजता शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. ही माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी दिली.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (नवी दिल्ली) चे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत. बदलत्या काळात ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, उत्पादनवाढ, साखर उतारा सुधारणा, मृदा व्यवस्थापन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिसंवादात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग तसेच विज्ञान केंद्र, बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग प्रमुख तुषार जाधव हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ऊस शेतीतील प्रत्यक्ष वापर आणि त्याचे आर्थिक फायदे याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.
निरा-भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गत ऊस हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून, त्याचे सकारात्मक आणि उत्साहवर्धक परिणाम दिसून येत आहेत. ऊस उत्पादनात वाढ, पिकांची गुणवत्ता आणि व्यवस्थापनात सुधारणा होत असल्याने हे तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे कारखाना प्रशासनाने स्पष्ट केले.
कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ऊस शेतीत मोठी क्रांती घडवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या परिसंवादाचा लाभ कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे तसेच कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले आहे.





