पुणे शहरात ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव

पुणे – शहरासह उपनगरात दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव सुरू होता. तर दिवसभरात शिवाजीनगर, एनडीए, पाषाण, मगरपट्टा यांसह आसपासच्या परिसरात पावसाच्या हलक्या एक ते दोन सरी पडल्या. दुपारी अडीचच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागात एक जोरदार सर आली आणि पुणेकरांची धांदल उडाली. पाच ते सात मिनिटे झालेल्या पावसानंतर पुन्हा कडक ऊन पडले. त्यानंतर हवामान कोरडे होते.
शहरासह जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दिवसाआड पडत असलेल्या पावसामुळे पुणेकर गोंधळून गेले आहे. सोमवारी (दि. १६) दिवसभर पावसाची रिपरिप होती. तर मंगळवारी (दि. १७) सकाळपासून शहरातील हवामान कोरडे तर अधूनमधून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आज दिवसभरात पावसाच्या एक ते दोन हलक्या सरी सोडल्या तर पावसाचा जोर कमीच होता.
आज सायंकाळपर्यंत निमगिरी येथे सर्वाधिक ११ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ गिरीवन येथे १०, भोर आणि कुरवंडे येथे प्रत्येकी ४, शिवाजीनगर परिसरात ३, तळेगाव भागात २.५, बारामती, एनडीए, मगरपट्टा आणि पाषाण परिसरात प्रत्येकी १ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. तर हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





