पिंपरी | पवन मावळात पावसाचा धुमाकूळ

पवनानगर, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पवन मावळ विभागाला जोरदार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिमुसळधार पावसामुळे पवनमावळातील ओढे, नाले, नद्या दुधडी भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.
विक्रमी पावसाची नोंद –
मागील २४ तासात पवन मावळात चालू हंगामातील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली. २४ तासात पवनाधरण परिसरात ३७४ मीमी पाऊस झाला. त्यामुळे पवनानगर बाजारपेठेत पाणी शिरले होते. या पाण्यामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले. ग्रामीण भागात काही ठिकाणच्या पॉलिहाऊसमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने फुलशेतीला फटका बसला.
लोहगड येथील मुख्य रस्ता खचला –
किल्ले लोहगड येथे जाणारा प्रमुख रस्ता खचल्याने दळणवळणाला फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे लोहगड- घेरेवाडी भागातील डांबरी रस्ता खचला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक गावांना भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.
तसेच परिसरातील इतरही रस्त्यांना खड्डे पडणे, तडे जाणे असे प्रकार घडले आहेत. प्रशासनाने तातडीने येथे पाहणी करून वाहतूकीसाठी रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
भातशेती पाण्यात, शेतकऱ्यांचे नुकसान –
मुसळधार पावसामुळे ओढे दुथडी भरून वाहत असल्याने आणि ओढ्यांचे पाणी सभोवतालच्या परिसरात पसरल्याने अनेक ठिकाणी भातशेती पाण्यात गेली आहे. दोन-दोन दिवस भातशेती जोराने वाहणाऱ्या पाण्याच्या खाली असल्याने भातशेतीचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. यासह अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटून शेतांचेही मोठे नुकसान झाले आहे.





