पुणे जिल्हा | बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात घेतली बैठक

बारामती, (प्रतिनिधी) – बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि. 10) नाराजी व्यक्त केली होती.
प्रशासनाने बुधवारी (दि. 11) सुळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीतही अधिष्ठाता यांच्याकडून यासंबंधी समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अधिष्ठाता म्हणतात आम्ही कार्यक्रमच घेतला नव्हता, मग फोटो, व्हिडीओ आले ते कशाचे, असा सवाल सुळे यांनी केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील मध्यवर्ती सभागृहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रम पत्रिकेत खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे नव्हती.
त्यामुळे सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगोलग बुधवारी सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के यांनी ही आमच्या समितीची बैठक असल्याचे सांगत माध्यम प्रतिनिधींना उपस्थित राहू दिले नाही.
बैठकीनंतर माहिती दिली जाईल असे ते म्हणाले. त्यांच्यासह प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, विभागप्रमुख अमोल शिंदे, उपअधिष्ठाता विवेक सहस्त्रबुद्धे बैठकीला उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, येथे कार्यक्रमच नव्हता, असे अधिष्ठाता सांगत आहेत. पण कार्यक्रम झाल्याचे फोटो, व्हीडीओ प्रसिद्ध झाले. माझ्या कालच्या पोस्टचा आणि आजच्या बैठकीचा काही संबंध नाही. या रुग्णालयासंबधी अनेक अडचणी माझ्या कानावर आल्या होत्या.
वृत्तपत्रात सातत्याने बातम्या येत आहेत. त्यामुळे ही बैठक मला घ्यायचीच होती. बैठकीत अधिष्ठाता यांना यासंबंधी विचारले. पण त्यांनी दिलेले उत्तर आणि प्रसिद्ध झालेले फोटो, व्हीडीओ यात तफावत आहे. त्यामुळे तुम्ही यासंबंधी त्यांनाच विचारलेले योग्य राहिल.
मुख्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्र
येथे प्रोटोकॉल पाळला गेला नाही. राज्य शासनाने प्रोटोकॉल बदलला आहे का, अशी विचाऱणा मी मुख्यमंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
हा देश संविधानाने चालतो.येथे झालेली कृती संविधान विरोधी आहे. प्रोटोकॉल बदलला असेल तर तसे आम्हाला अवगत करा, अशी मागणी मी पत्रात केली असल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या सुळे यांच्याकडे तक्रारी
ही बैठक संपल्यानंतर मेडिकल कॉलेजविषयी नागरिकांनी खासदार सुळे यांच्याकडे विविध तक्रारींचा पाढाच वाचला. येथे आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. रुग्णांना येथे दाखल करून घेण्याऐवजी खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो.
औषधे मिळत नाहीत, रुग्ण येथून दुसरीकडे हलविण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी जादा पैसे मागितले जातात, अशा तक्रारी रुग्णांच्या काही नातेवाईकांनी सुळे यांच्याकडे केल्या.




