Pune District: शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्या-खासदार सुप्रिया सुळे

देशाच्या ऐक्यासाठी आम्ही काहीही करायला तयार
इंदापूर – नुकसान ग्रस्त शेतकर्यांवर फार मोठा अन्याय होत आहे. जून महिन्यामध्ये मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटायला गेले होते. ते देशाचे सहकार मंत्री आहेत म्हणून भेटायला गेले होते. त्यांनी सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी मी पहिल्यांदा त्यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर पुन्हा मी दिल्लीला जाऊन कृषिमंत्री यांची देखील भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषिमंत्री यांनी फोन केला. सर्व शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी आमची आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
इंदापूर येथे मंगळवारी (दि. 7) तहसीलदार, बीडीओ, नगरपालिका मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्यांसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकार्यांसमवेत विषेश बैठक घेतली. यावेळी नागरिकांनी पाणी प्रश्न, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, लाडकी बहीण योजनामध्ये कमी करण्यात आलेली नावे, काळेवाडी आणि पळसदेव येथील स्मशानभूमीच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे विविध प्रश्न आणि समस्या उपस्थित केल्या. त्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या.
खासदार सुळे म्हणाल्या, सरकारला आगामी काळात दोन पद्धतीने काम करावे लागणार आहे. एकतर सरसकट कर्जमाफी व दुसरे शाळा, घरे नागरिकांचा प्रपंच, याचे जे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई देण्यासाठी काम करावे लागणार आहे. ज्या गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे ते शून्यापासून पुढे न्यायचे आहे. गाव उभारायचे आहे, नवीन कर्ज मिळण्यासाठी मदत या गोष्टी देखील सरकारने केल्या पाहिजेत, शेतकर्यांकडे वसुली बंद करा, अशीही अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सत्ता म्हणजे काय असते, जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा त्याला मदत केली पाहिजे. कोरोना होता त्यावेळेस माणुसकीच्या नात्याने सर्व यंत्रणा पुढे आली होती. दिल्लीला पंतप्रधानांना आम्ही प्रस्ताव केलेला आहे, सर्व पार्टीच्या प्रमुखांना बोलवा चर्चा करा, जेव्हा ऑपरेशन शेंदूर होते तेव्हा आम्ही प्रदेशात गेलो होतो का नाही. आमच्यासाठी पहिल्यांदा देश मग राज्य मग पक्ष देशाच्या ऐक्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. अशी ही स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.





