Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र यातील पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती बाद करण्यात आले आहे. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. अर्जावर अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी केल्याने एक, एबी फॉर्म न जोडल्याने एक, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने एक तर एबी फॉर्मवर खाडाखोड केल्याने दोन असे एकूण पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे शिंदेसेनेचे निवडणूक मैदानात आता 49 उमेदवार राहिले आहेत. पाच उमेदवारांचे अर्ज बाद शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले. प्रभाग आठमधील शिंदेसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. अनुमोदकाच्या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर ती चुकीची असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. प्रभाग ६ मध्ये विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा शिंदेसेनेकडून उमेदवारीचा अर्ज अवैध ठरला तर त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला आहे. प्रभाग ६ मधील उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांचा शिंदेसेनेचा उमेदवारी अर्ज बाद झाला असून त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग १६ मध्ये हर्षवर्धन कोतकर यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा शिंदेसेनेकडील अर्ज अवैध ठरवण्यात आला. अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग १७ मध्ये गौरी ननावरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा शिंदेसेनेचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. अपक्ष अर्ज वैध ठरला. दरम्यान, शिवसेनेबरोबरच, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरला आहे. Eknath Shinde | प्रभाग १६ मधील सुनीता संजय कोतकर यांनी उद्धवसेना व शिंदेसेना अशा दोन्ही पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीच्यावेळी त्यांनी शिंदेसेनेकडील अर्ज कायम ठेवला. तर प्रभाग ८ मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूरखा फत्तेखा पठाण यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचक अन्य प्रभागातील असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. याशिवाय प्रभाग १५ मधील भाजपचे उमेदवार सुजय अनिल मोहिते व दत्तात्रेय सोमनाथ गाडळकर यांच्या अर्जावर आक्षेप नोंदविण्यात आला होता. Eknath Shinde | दरम्यान, अहिल्यानगर महापालिकेच्या 68 जागांसाठी एकूण 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या प्रक्रियेत एकूण 17 अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले, तर 771 अर्ज वैध ठरले आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा पहिला दिवस असून 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेणार? याकडे लक्ष लागले आहे. Eknath Shinde | हेही वाचा: राजकारणामुळे पडली फूट! पतीच्या निर्णयामुळे पत्नीने गाठलं माहेर; म्हणाल्या ” राजकीय वाद टाळण्यासाठी…”