मुंबई : ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी असल्याचा आरोप शिंदे यांनी केले आहेत. ते म्हणाले की, काही युती जनतेच्या विकासासाठी होतात, पण ही युती फक्त सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो, असं शिंदे यांनी म्हंटले आहे. शिंदे पुढे म्हणाले, मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिली जाते, पण आता ही कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू झाले आहे. ठाकरे बंधूंनी मुंबईचा विकासाचा अजेंडा मांडलाच नाही, त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विकासावर एक शब्दही नाही. त्यांचा अजेंडा फक्त सत्ता आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी ,म्हटलं आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर फेकले एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर गंभीर आरोप केला की, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडून दिलेल्यांना जनतेने आपली जागा दाखवली आहे. असली आणि नकली यात फरक नगरपालिका निवडणुकीत दिसला. मुंबईकरांना मुंबईबाहेर फेकले गेले ते यांच्यामुळे. आम्ही मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचे काम करतोय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी विकासाचे उदाहरण देताना सांगितले, रमाबाई आंबेडकर नगरातील 17 हजार घरांचे पुनर्विकासाचे काम आम्ही मार्गी लावले. पुढील सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त होईल. आमचा अजेंडा मुंबईचा विकास आहे. आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई कशी सांभाळणार? शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर अतिशय तीव्र टोला लगावला, जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते राज्य किंवा मुंबई कशी सांभाळणार? कोरोना काळात फक्त पैसा खाल्ला. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हाच हे ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास हवा आहे.