Political News : मोठा राजकीय भूकंप? 50-60 आमदार बंडखोरीच्या तयारीत, राजकीय वर्तुळात खळबळ
Political News : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत असंतोष कमालीचा वाढल्याचे चित्र आहे.

Political News : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यातील फुटीनंतर आता तसाच राजकीय भूकंप पश्चिम बंगालमध्ये होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून, तब्बल 50 ते 60 आमदार पक्ष सोडू शकतात, असा दावा काही वृत्तांमधून केला जात आहे. गेल्या काही दिवसांत पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले असून काहींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींची अनेक आमदार साथ सोडू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत असंतोष कमालीचा वाढल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी दोन आमदारांना पक्षातून बाहेर काढले होते. मात्र त्यानंतर राज्यभरात राजीनाम्यांची मालिका सुरू झाल्याने TMCमधील अस्थिरता अधिक वाढल्याचे दिसत आहे.
काही आमदार आणि खासदार पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार 50 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Political News )
जर एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी पक्ष सोडला, तर TMC पक्ष दोन गटांमध्ये विभागला जाऊ शकतो. ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांच्या नेतृत्वाखाली नवीन राजकीय गट तयार होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे.
या घडामोडींची तुलना महाराष्ट्रातील राजकीय फुटींशी केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फाटे पडले होते. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह यावरही वाद निर्माण झाले होता. अजूनही नाव आणि चिन्हाबाबत सर्वेाच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. आता पश्चिम बंगालमध्येही तसाच राजकीय भूकंप होतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
ममतांनी व्यक्त केला संताप (Political News)

Political News : मोठा राजकीय भूकंप? 50-60 आमदार बंडखोरीच्या तयारीत, राजकीय वर्तुळात खळबळ
दरम्यान, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीत केवळ २० आमदारांनी उपस्थित राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच टीएमसीच्या अनेक नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “कालपर्यंत जे लोक माझ्या पाया पडत होते, ते आज उलट-सुलट वर्तन करत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
थेट इशारा (Political News)
आमच्या पक्षाचे नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत, अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे खोट्या असल्याचे ममता बॅनर्जींनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर, भाजपने बाहेरून लोक आणून अभिषेक यांच्यावर हल्ला केल्याचा दावाही त्यांनी केला. “हल्लेखोरांना जेवण पुरवले गेले आणि याचे पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर मीसुद्धा ‘खेला’ (खेळ) करेन,” असा थेट इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.





