IPS Suspended: एकाचवेळी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना केले निलंबित; पश्चिम बंगालमध्ये खळबळ
IPS Suspended: या अधिकाऱ्यांवर प्रकरणाची हाताळणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा, पीडितेच्या पालकांना लाच म्हणून पैशांची ऑफर दिल्याचा तसेच या प्रकरणात अनधिकृत पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप आहे.

IPS Suspended: आरजी कर रुग्णालयातील बलात्कार-हत्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तपासात कथित हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपांवरून पश्चिम बंगाल सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
निलंबित अधिकाऱ्यांमध्ये माजी कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल तसेच माजी उपायुक्त इंदिरा मुखर्जी आणि अभिषेक गुप्ता यांचा समावेश आहे. राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री अधिकारी यांनी सांगितले की, या तिघांविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या अधिकाऱ्यांवर प्रकरणाची हाताळणी चुकीच्या पद्धतीने केल्याचा, पीडितेच्या पालकांना लाच म्हणून पैशांची ऑफर दिल्याचा तसेच या प्रकरणात अनधिकृत पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री अधिकारी यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकार गुन्ह्याच्या मूळ तपासात हस्तक्षेप करीत नसून हा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) केला जात आहे आणि न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे.
या प्रकरणातील विभागीय चौकशी आणि शिस्तभंगाची कारवाई राज्याचे गृहसचिव मुख्य सचिवांच्या मार्गदर्शनाखाली करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





