Nitin Gadkari Visit Sonai Dairy : नितीन गडकरी थेट ‘सोनाई डेअरी’वर! ग्रामीण विकासाचा ‘हा’ पॅटर्न पाहून केंद्रीय मंत्रीही भारावले
Nitin Gadkari Visit Sonai Dairy : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गोखळी येथील 'सोनाई डेअरी'च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट; आधुनिक तंत्रज्ञानाचे केले कौतुक.

Nitin Gadkari Visit Sonai Dairy – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतीसोबत पूरक उद्योग उभारणे ही काळाची गरज आहे. ‘सोनाई परिवाराने’ दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून उभा केलेला ग्रामीण विकासाचा आदर्श पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
इंदापूर ते बारामती पालखी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानिमित्त नितीन गडकरी यांनी तालुक्यातील गोखळी येथील ‘सोनाई डेअरी’च्या मुख्य प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने व प्रवीण माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. प्रकल्प परिसराची पाहणी करताना गडकरी यांनी येथील आधुनिक तंत्रज्ञान, दूध प्रक्रिया व्यवस्था, शेतकरी सहभाग आणि ग्रामीण रोजगारनिर्मितीबाबत विशेष समाधान व्यक्त केले.
मंत्री गडकरी म्हणाले, दशरथ माने यांच्या नेतृत्वाखाली सोनाई परिवाराने हजारो शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायाशी जोडून त्यांच्या उत्पन्नात वाढ केली आहे. विशेषतः ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. भविष्यातील विकासाचा मंत्र देताना गडकरी म्हणाले, “आगामी काळ हरित ऊर्जा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा आहे.
उद्योगांनी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वतःची वीज स्वतः निर्माण करावी, ज्यामुळे ते अधिक सक्षम ठरतील. तसेच शेतीमालावर आधारित उद्योगांनी इथेनॉल उत्पादनाकडे वळणे गरजेचे आहे. इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल आणि देशाचे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.”
सोनाई परिवारानेही या मार्गदर्शनाचा स्वीकार करत भविष्यात पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे हरिश्चंद्र माने, विष्णूकुमार माने, प्रविण माने, अतुल माने आणि किशोर माने उपस्थित होते.
ग्रामीण विकासासाठी ‘सोनाई मॉडेल’ दिशादर्शक
दुग्ध व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान, ग्रामीण रोजगारनिर्मिती आणि शेतकरी सक्षमीकरण यांचा प्रभावी संगम घडवत सोनाई परिवाराने उभा केलेला पॅटर्न राज्यातील ग्रामीण अर्थकारणासाठी दिशादर्शक ठरत असल्याची भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.





