रेल्वे रुळांवर दगडांचा थर; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आकुर्डीजवळ दुर्घटना टळली

पुणे – रेल्वे रुळांवर दगडांचे थर रचून अपघात घडविण्याचा डाव रेल्वे कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला. आकुर्डी स्थानकाजवळ असलेल्या रुळावर दुपारी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आता परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली जात आहे.
लोणावळ्यावरून एक लोकल पुण्याकडे येत होती. आकुर्डी रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर त्या लोकलमधील गार्ड संदीप भालेराव यांना पुणे- मुंबई मार्गावर (अप लाइन) मोठमोठे दगड ठेवल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ चिंचवड स्टेशनचे उपव्यवस्थापक मॅथ्यू जॉर्ज यांना माहिती दिली. त्यावेळीच पुणे स्टेशनवरून नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस त्या मार्गावरून जाणार होती. नियंत्रण कक्षाद्वारे त्या गाडीच्या चालकांना सावधानतेचा इशारा देत गाडी हळू चालविण्याची सूचना करण्यात आली.
त्यावेळी जवळच वरिष्ठ विभागीय इंजिनिअर शैलेंद्र त्रिपाठी हे पाच जणांसह काही तांत्रिक काम करत होते. त्यांना याबाबत माहिती दिल्यावर पथकाने हे दगड बाजूला केले. त्यानंतर सेवा सुरळीत सुरू झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली. दरम्यान, आता आता रेल्वे सुरक्षा दल आणि इंजिनिअरिंग विभाग संयुक्तपणे रेल्वे ट्रॅकचे पेट्रोलिंग करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





