Bhor News : भोरच्या राजकारणात ‘विशाल’ वादळ! बंटी कोंडे यांच्या हाती ‘घड्याळ’; विरोधकांमध्ये खळबळ, राजकीय समीकरणे ढवळून निघणार

भोर : राजकारणात एक हलकीशी हालचालही मोठा भूकंप घडवू शकते, याचं जिवंत उदाहरण आज सकाळी भोर तालुक्यात पाहायला मिळालं. भाजपचा हायवे पट्ट्यातील बलाढ्य कार्यकर्ता आणि लोकप्रिय चेहरा असलेले विशाल उर्फ बंटी कोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केल्याने भाजप गटात मोठी खळबळ उडाली आहे.
आज पुण्यात झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकरराव मांडेकर यांनी स्वतः उपस्थित राहून बंटी कोंडे यांना पक्षप्रवेश करून दिला. यावेळी कोंडे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले.
बंटी कोंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून हायवे पट्ट्यात भाजपचे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचा कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा जनसंपर्क आणि विश्वास होता. त्यामुळे त्यांच्या या अचानक राष्ट्रवादीत झालेल्या प्रवेशामुळे भाजपमध्ये मोठ्या अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
केवळ भाजपच नव्हे, तर इतर राजकीय पक्षांच्याही गणितांवर या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार आहे. नसरापूर, वेळू, किकवी, भोगवली, वेल्हेच्या सीमेलगत असलेला हायवे पट्टा हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निर्णायक मानला जात आहे. याच भागात बंटी कोंडे यांचा मजबूत जनाधार असल्याने त्यांच्या राष्ट्रवादीमधील आगमनामुळे विरोधी पक्षांमध्येही चिंतेचे सावट आहे.
राजकीय जाणकारांचं मत आहे की, “कोंडे यांचा प्रवेश म्हणजे फक्त नेत्याचा बदल नव्हे, तर भोरच्या राजकारणाची दिशा बदलणारा ऐतिहासिक क्षण आहे. हे एकप्रकारे ‘गेमचेंजर’ ठरू शकतं.”
राष्ट्रवादीने या प्रवेशामुळे केवळ ताकद वाढवली नाही, तर एक शक्तिशाली संदेशही दिला आहे की, पक्ष आता भोरमध्ये पुन्हा सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे.
आता भोरच्या राजकारणात पुढे काय घडतं? कोण बाजी मारतो? कोण गमावतो?
या प्रश्नांनी सध्या संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक मात्र निश्चित – बंटी कोंडे यांचा हा प्रवेश भोरच्या राजकीय इतिहासात मोठं वळण ठरणार आहे.





