पिंपरी | ऑफबीटकडून संपर्क बालग्राममधील मुलींना विविध वस्तूंची भेट

लोणावळा, (वार्ताहर) – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुंबई स्थित ऑफबीट फाउंडेशन तर्फे संपर्क बालग्राम येथील आश्रयित मुलींना दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साधनसामग्री तसेच काही जीवनावश्यक वस्तू देणगी स्वरूपात देण्यात आल्या.
यासह आश्रमातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळांची तयारी करता यावी यासाठी काही क्रीडासामग्री उपलब्ध करुन देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ऑफबीट फाउंडेशनकडून भाजे येथील संपर्क बालग्राम येथील मुलींच्या अनाथ आश्रमाची माहिती जाणून घेण्यात आली.
यावेळी ऑफबीट फाउंडेशनचे उपाध्यक्ष राहुल भडाळे आणि इतर सदस्य, संपर्कचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, माजी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, लोहगड विकास सोसायटी चेअरमन गणेश धानिवले, लोहगड ग्रामपंचायत उपसरपंच ज्योती धानिवले, भाजे ग्रामपंचायत सरपंच प्रिया ओव्हाळ, संपर्कचे प्रभारी सुभाष भोंगर्डे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राहुल भडाळे यांनी त्यांच्या संस्थेविषयी बोलताना सांगितले की, समाजातील दुर्बल घटकांच्या खास करून लहान मुला-मुलींच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष केंद्रीत करून त्यांचे जीवन बदलण्याचे एक ध्येय उराशी बाळगून सन २०१७ मध्ये ऑफबीट फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.
माणुसकीच्या नात्याने तसेच आमच्या प्रयत्नात कोणतीही कसर न सोडता, धाडसी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे या क्षेत्रात कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी नमूद केले.





