महाराष्ट्रात खळबळ…! जिवंत व्यक्तीस मृत घोषित करून दिलं डेथ सर्टिफिकेट; अंत्यविधीच्या तयारीत असतानाच कळलं सत्य

उल्हासनगर : मुंबईच्या उल्हासनगरमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात निष्काळजीपणाचा अतिरेक करणारी धक्कादायक घटना उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. अभिमान तायडे (वय 65) या व्यक्तीस डॉक्टरांनी तपासणी न करताच मृत घोषित केलं आणि थेट डेथ सर्टिफिकेटही देऊन टाकलं. नातेवाईकांनी त्यांना घरी नेऊन अंत्यविधीची तयारी सुरू केली होती.
मात्र, तायडे यांच्या छातीची धडधड जाणवताच नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. तातडीने त्यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे उपचार सुरू होताच ते शुद्धीवर आले. ही घटना समजताच शिवनेरी हॉस्पिटल आणि डॉ. आहुजा यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. आहुजा यांनी चूक मान्य करत म्हटलं की, “रुग्णाची नस मिळाली नाही, तसेच आजूबाजूला गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. “चुकीने मृत घोषित केले, याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
” तर मला कावीळ झाली होती माझी तब्येत बरी आहे आता जेवण केले आहे. अशी प्रतिक्रिया रुग्ण अभिमान तायडे यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ; तरुणावर हल्ला
बारकूपाडा परिसरात किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. गाडी मधे आल्याने वाद झाला आणि एका तरुणाने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली. यानंतर संतप्त समर्थकांनी त्या तरुणावर वार केले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील काही नागरिकांनी माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली.
या झटापटीत तरुण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.





