जुन्नरच्या शिरपेचात मानाचा तुरा! शेतकऱ्याने विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ला केंद्राची मानाची मोहोर

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी विकसित केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या विशेष आंब्याच्या वाणाला केंद्र शासनाकडून ‘शेतकरी जात’ (Farmer Variety) म्हणून अधिकृत मान्यता मिळाली आहे.
दिल्ली येथील ‘प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी अँड फार्मर्स राईट ॲथॉरिटी’ संस्थेकडून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून, यामुळे या आंब्याच्या जातीच्या प्रसाराचे हक्क भरत जाधव यांना मिळाले आहेत.नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्यातून हे यश मिळाले आहे.
केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर यांना जाधव यांच्या बागेतील वैशिष्ट्यपूर्ण वाणाबद्दल माहिती मिळाल्यानंतर उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर आणि पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी पाहणी करून नोंदणीसाठी प्रस्ताव तयार केला होता. भरत जाधव यांनी मागील २२ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने ४०० हून अधिक आंब्याच्या झाडांची लागवड केली असून, ते शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरतात.
‘जुन्नर गोल्ड’ची वैशिष्ट्ये
-एका फळाचे सरासरी वजन ९०० ते ९७० ग्रॅम
-हापूस, केशर आणि राजापुरी तिन्हींची संमिश्र चव
-राजापुरी आंब्यासारखा मोठा आकार
-आकर्षक केसरी रंग
-दरवर्षी फळधारणा होणारे वाण





