Maval News – घरगुती गॅस सिलेंडरसाठी वाढलेली प्रतीक्षा, दुकानांमध्ये लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि वाढत्या खर्चामुळे ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी ऊर्जास्रोतांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत गोबर गॅस (बायोगॅस) प्रकल्प हा प्रभावी आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत असून नाणे मावळ परिसरातील काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी हा प्रकल्प उभारला आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर अनेकदा २० ते २५ दिवसांनी गॅस उपलब्ध होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी गॅस एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अतिरिक्त खर्च होतो. या त्रासातून मार्ग काढण्यासाठी काही शेतकरी आता गोबर गॅस प्रकल्प उभारण्याकडे वळताना दिसत आहेत. नाणे मावळ परिसरात सध्या किमान चार ते पाच शेतकऱ्यांनी गोबर गॅस प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पातून तयार होणारा गॅस घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. विशेष म्हणजे या प्रक्रियेनंतर उरलेला अवशेष हा सेंद्रिय खत म्हणून अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्यास मदत होत आहे. ग्रामीण भागात बहुतांश कुटुंबांकडे गायी, म्हशी किंवा बैल यांसारखी जनावरे असल्याने शेण सहज उपलब्ध होते. या शेणाचा योग्य वापर करून गोबर गॅस प्रकल्प उभारल्यास घरगुती इंधनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. त्याचबरोबर हा पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत असल्यामुळे प्रदूषणही कमी होण्यास मदत होते. दरम्यान, शासनाकडूनही गोबर गॅस प्रकल्प उभारण्यासाठी विविध योजना आणि अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकतात. त्यामुळे नाणे मावळ परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी गोबर गॅस प्रकल्प उभारण्याचा विचार करावा, असे आवाहन प्रगतिशील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. “२०१८ साली आम्ही आमच्या शेतावर गोबर गॅस प्रकल्प उभारला. आजच्या घडीला सकाळी गॅस सुरू केला की तो संध्याकाळपर्यंत चालू राहतो. त्यामुळे गॅस संपण्याची चिंता राहत नाही. शिवाय पैशांची आणि वेळेचीही मोठी बचत होते.” – तुकाराम चोपडे, प्रगतिशील शेतकरी