Indapur News : गॅस टंचाईवर बायोगॅसचा उतारा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १०० संयंत्रांचे वाटप
Indapur News : गॅस टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी बायोगॅस काळाची गरज; जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी शेळगाव ठरले प्रेरणादायी.

Indapur News – सध्या सर्वत्र जाणवणाऱ्या घरगुती गॅसच्या टंचाईमुळे गृहिणींसह व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी बायोगॅसचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे ‘पॅरिसिटेट फाउंडेशन’ (बारामती) आणि ‘इको सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ यांच्या सीएसआर निधीतून तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने १०० शेतकऱ्यांना बायोगॅस संयंत्रांचे वाटप करण्यात आले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते हे वाटप संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना भरणे म्हणाले की, “शासकीय योजनांचा लाभ घेण्यात शेळगाव नेहमीच अग्रेसर राहिले आहे. पाणीटंचाई लक्षात घेता शेततळी उभारणे आणि गॅस टंचाईसाठी बायोगॅसचा वापर करणे आवश्यक आहे. बायोगॅस यंत्र बसवण्याचा शेळगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी आहे.”
इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्याची सुचना त्यांनी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांना दिली. अभिमन्यू नागवडे यांनी यंत्राबाबत माहिती देताना सांगितले की, ४८ हजार रुपये किमतीचे हे संयंत्र अनुदानित तत्त्वावर केवळ १४ हजार रुपयांत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. यामुळे दरमहा इंधनाची मोठी बचत होईल. तसेच, यातून वर्षाला ८ ते १० हजार रुपये किमतीचे दर्जेदार सेंद्रिय खत मिळेल.
हे संयंत्र पूर्णपणे पर्यावरणपूरक असून किमान २० वर्षे टिकणारे आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सोनाली जाधव, माजी सदस्य विठ्ठल जाधव, इंदापूर पंचायत समिती सभापती हर्षवर्धन लोंढे, उपसभापती जयकुमार कारंडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, सरपंच उर्मिला शिंगाडे, उपसरपंच रेश्मा जाधव, कर्मयोगीचे संचालक अंबादास शिंगाडे, छत्रपतीचे संचालक विठ्ठल शिंगाडे, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप,
भैरवनाथ सोसायटीचे उपाध्यक्ष उमेश ननवरे, माजी उपाध्यक्ष छगन शिंगाडे, राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष अतुल झगडे, हनुमान सोसायटीचे संचालक बापूराव दुधाळ, संजीवनी सोसायटीचे संचालक गणपत भोंग, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चवरे, मोहन खराडे, डॉ. निलेश शिंगाडे, प्रताप चवरे, पंडित ननवरे, सागर वाघमोडे, सदस्या स्वाती शिंगाडे, प्रणिता जाधव, तात्यासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, पोलीस पाटील उषा वाघमोडे उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश सुपुते यांनी केले. तर, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी आभार मानले.






