शहरातील दोन अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. चिंचवडमधील लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या दोन अनधिकृत शाळांवर गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या गुन्ह्यात ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे जे डीकोस्टा (रा. बंगलोर) आणि समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुस-या गुन्ह्यामध्ये लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूलचे श्रेयकुमार (रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये विलास दयाराम पाटील (वय 51, रा. नवी सांगवी) यांनी सोमवारी (दि. 15) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 पासून आरोपींनी शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियम व अटींची पूर्तता न करता लिटील स्टार इंग्लिश मिडियम स्कूल आणि ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल या शाळा सुरू ठेवल्या. तसेच शाळा अधिकृत असल्याचे पालकांना भासवून विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे शाळेत प्रवेश देत फी वसूल केली. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेऊन शासन, विद्यार्थी व पालक यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शहरात 11 अनधिकृत शाळा
पिंपरी चिंचवड शहरातील शाळांची तपासणी केली असता त्यामध्ये 11 शाळा अनधिकृत असल्याचे दिसून आले. यामध्ये काही राजकीय नेत्यांच्याही शाळांचा समावेश आहे. या शाळांवर कारवाई होणार का, अशी चर्चा शहरात सुरू होती. मात्र शिक्षण विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे.





