पिंपरी | अनधिकृत शाळांवर कारवाईची मागणी

कामशेत, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात एकूण चार शाळा अनधिकृत असल्याचे शासनाने घोषित केले आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून यात आमची चूक काय? असा सवाल पालकवर्ग करीत आहेत.
तालुक्यातील चार शाळा अनधिकृत असल्याची माहिती असताना देखील त्यांच्यावर आजवर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.आर. वाळुंज यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात, तालुक्यात अनधिकृत शाळा चालविणाऱ्या शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा, शाळा अनधिकृत आहेत हे माहिती असून देखील त्यावर कारवाई न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा,
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे लेखी निवेदन सह्याद्री विद्यार्थी अकादमीने गटशिक्षणाधिकारी वाळुंज यांना दिले आहे. किरण ढोरे, किशोर वाघमारे, चेतन वाघमारे, केदार डाखवे, सौरभ घारे, चेतन सांडभोर हे यावेळी उपस्थित होते.





