सणासुदीच्या काळात मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण

पुणे – जागतिक बाजारपेठेत तेलाचा वाढलेला पुरवठा, इंडोनेशिया, मलेशियात पाम तेलाचे आणि देशात तेलबियांचे झालेल्या जास्त उत्पादनामुळे खाद्यतेलांच्या भावात घसरण झाली आहे. 15 किलोच्या डब्यामागे 300 ते 600 रुपयांनी घट झाल्याची माहिती खाद्यतेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली. तर किरकोळ बाजारात किलोच्या भावात 20 ते 30 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळी सणात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
मार्केट यार्डातील भुसार विभागात रोज विविध प्रकारच्या खाद्यतेलांची सुमारे 100 टनांची आवक होते. महिनाभरापूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या भावाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारात खाद्यतेलाची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत होता. मात्र आता भावात मोठी घट झाली आहे.
जोपर्यंत जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहिल. तोपर्यंत खाद्यतेलाचे भावत वाढ होणार नाही. शहरातही खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या भावात घट झाली असल्याचे नहार यांनी सांगितले. जागतिक बाजारपेठेत भारत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. भारताला वर्षाला 225 लाख टन तेलाची गरज आहे. देशात दरवर्षी साधारणतः 80 लाख टन तेलनिर्मिती केली जाते. अंदाजे 150 लाख टन तेलाची भारतात परदेशातून आवक होते.
घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे 15 किलोचे भाव
- तेलाचा प्रकार — आधीचे भाव — आताचे भाव
- पाम — 1900 ते 2100 — 1600 -1620
- सूर्यफुल — 2400 ते 2600 — 2050-2230
- सोयाबीन — 2070 ते 2250 — 1820-2080
- सरकी तेल — 2050 ते 2080 — 1900
- वनस्पती — 2000 ते 1980 — 1480





