Stock Market Updates: भारतीय शेअर बाजारासाठी बुधवारचे ट्रेडिंग सत्र अतिशय उत्कृष्ट राहिले. सकाळी घसरणीसह बाजार उघडला असला, तरी गुंतवणूकदार खरेदीकडे परतल्यानंतर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. सेन्सेक्स खालच्या पातळीपासून 1,000 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर निफ्टी खालच्या पातळीपासून 300 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात मिड कॅप समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 690 अंकांच्या उसळीसह 71,060 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 215 अंकांच्या उसळीसह 21,453 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात शेअर बाजारात सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस या समभागांमध्ये वाढ झाली. कालच्या घसरणीनंतर मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 853 अंकांच्या वाढीसह आणि स्मॉल कॅप निर्देशांक 260 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 वाढीसह आणि 50 निफ्टी समभागांपैकी 41 समभाग वाढीसह आणि 9 समभाग घसरणीसह बंद झाले.
मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ
शेअर बाजारातील जोरदार वाढीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.50 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईचे मार्केट कॅप 371.39 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 365.97 लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते.
वाढणारे आणि घसरणारे शेअर्स –
आजच्या व्यवहारात टाटा स्टील ३.८८ टक्के, पॉवर ग्रिड ३.४९ टक्के, एचसीएल टेक ३.४४ टक्के, इंडसइंड बँक ३.२३ टक्के, टेक महिंद्रा ३.०९ टक्के, एचयूएल २.९० टक्के वाढीसह बंद झाले. आयसीआयसीआय बँक २.९४ टक्क्यांनी, अॅक्सिस बँक २.७७ टक्क्यांनी, एशियन पेंट्स १.९१ टक्क्यांनी, टीसीएस ०.३६ टक्क्यांनी घसरून बंद झाले.