कोपरगाव -जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव न्यायालयाने एकाच दिवशी तब्बल 4 हजार 871 प्रलंबित खटले निकाली काढून जिल्ह्यात विक्रम केला आहे. तडजोडीअंती 5 कोटी 41 लाख 73 हजार 841 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय खटले निकालात कोपरगाव न्यायालय अव्वल ठरल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश कोऱ्हाळे यांनी दिली.
तालुक्यातील 79 गावांमध्ये जिल्हा न्यायाधीश कोऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक जनजागृती करून 26 शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून गावोगावी जावून कायदेविषयक कायदे तज्ज्ञांनी मार्गदर्शन करीत नागरिकांना प्रबोधन केल्याने नागरिकांमध्ये जागृती झाली. त्यामुळे बहुतांश खटले दाखल होण्यापूर्वीच निकाली काढण्यात यश आले.
कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन कोपरगाव न्यायालयात करण्यात आले होते. या लोकन्यायालयात दाखलपूर्व व दाखल असे दोन्ही प्रकारची 10 हजार 893 प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दाखलपूर्व 8 हजार 675 प्रकरणांपैकी 4 हजार 644 प्रकरणे निकाली काढत 2 कोटी 48 लाख 18 हजार 838 रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच दाखल 2 हजार 218 प्रकरणांपैकी 127 प्रकरणे निकाली काढत 2 कोटी 93 लाख 55 हजार 3 रुपयांची वसुली करण्यात आली. सर्व मिळून 5 कोटी 41 लाख 73 हजार 841 रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. कोपरगाव न्यायालयाने खटले निकालात जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला तर दंडात्मक वसुलीत राहाता न्यायालय अग्रभागी आहे. राहाता न्यायालयाने सर्वाधिक 15 कोटी 40 लाख 29 हजार दहा रुपये इतकी वसुली केली.
याप्रसंगी कोपरगाव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सयाजीराव कोऱ्हाळे, जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश स्मिता बनसोड, सहकार न्यायाधीश ल.मू.सय्यद, कोपरगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड.शिवाजी खामकर, कोपरगाव जिल्हा सरकारी वकील ऍड.अशोक वहाडणे, कोपरगाव जिल्हा सहाय्यक सरकारी वकील ऍड. शरद गुजर, सहाय्यक सरकारी वकील ऍड. अशोक टुपके, ऍड. मनोहर येवले, ऍड.योगेश खालकर, ऍड. अमोल टेके, ऍड. दीपक जाधव, ऍड.सी. एम वाबळे, ऍड. केतन शिरोडे, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे सचिव बंडू बडे, सागर नगरकर, न्यायालयीन कर्मचारी सूरज माळोदे, सागर गुरसाळे, राहुल बोडके, अशोक दहिफळे यांच्यासह लोकन्यायालयात दाखल केलेल्या विविध खटल्यांचे पक्षकार, वकील, संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, राष्ट्रीय लोकन्यायालयात कोपरगाव न्यायालयाच्या वतीने आठ पॅनल करण्यात आले होते. लोकन्यायालयात फौजदारी प्रकरणे, वाहन अपघात, भूसंपादन प्रकरणे, एन.आय.कायदा 138 ची प्रकरणे, युनियन बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया व इतर बॅंका व पतसंस्थांची प्रकरणे, ग्रामपंचायत, बीएसएनएल यांची प्रि-लिटिगेशन प्रकरणे, सहकार न्यायालय, तहसिल कार्यालय यांची दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता. तालुक्यात दि. 31 ऑक्टोबर ते दि. 13 नोव्हेंबर या कालावधीत कायदे विषयक जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. शाळा महाविद्यालये व गावपातळीवर विविध ठिकाणी 26 शिबिरे घेण्यात आले. यासाठी सर्व न्यायाधीश, वकील व सामाजिक संघटनांनी सहकार्य केले.
25 हजार 823 खटले निकाली
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या न्यायालयातून 25 हजार 823 खटले निकाली काढण्यात आले. 66 कोटी 30 लाख 34 हजार 760 रुपयांची आर्थिक वसुली करण्यात आली. वसुलीत राहाता न्यायालय तर खटल्यात कोपरगाव न्यायालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.