पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हेरिटेज वॉक या उपक्रमाची करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या थाटात सुरूवात करण्यात आली. मात्र प्रत्येक महिन्यातून दोनदा ठराविक वेळेत नागरिकांसाठी हेरिटेज वॉक खुला राहणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. मात्र ऐतिहासिक वारसा जतन एकत्रित करीत सुरू केलेल्या हेरिटेज वॉकची अद्यापही वेळ निश्चित आली नाही. विद्यापीठाने नागरिकांच्या सोयीसाठी हेरिटेज वॉकची वेळ प्रसिद्ध करावी, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यापीठात हा उपक्रमाची कुलगुरू प्रा. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू प्रा.एन.एस.उमराणी आणि कुलसचिव प्रा. प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यावेळी उपस्थितांना इतिहास विभागातील प्रा. श्रद्धा कुंभोजकर, प्रा.बाबासाहेब दूधभाते, मानवशास्त्र विभागप्रमुख डॉ.शंतनू ओझरकर तसेच संशोधकांनी मार्गदर्शन केले.
विद्यापीठातील ऐतिहासिक मुख्य इमारतीला 151 वर्षे पूर्ण झाली आहेत. या इमारतीत असणाऱ्या दुर्मिळ चित्रांचा वारसादेखील विद्यापीठाने जतन केला आहे. हे सर्व चित्र हेरेज वॉकच्या निमित्ताने सर्वांना पाहता येत आहे. हा पुन्हा ठराविक वेळेत पुन्हा सुरू होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. ठराविक वेळ म्हणजे कोणती वेळ असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. हेरिटेज वॉक पाहण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. मात्र आता ठराविक वेळ विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर होतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.