मोठा बदल..! ‘९ ते ५’ संपलं, आता खासगी क्षेत्रात १० तासांची नवी शिफ्ट

मुंबई : राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स आणि इतर खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या खासगी कामगारांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार खासगी आस्थापनांतील कामगारांचे दैनंदिन कामकाजाचे तास ९ वरून १० पर्यंत वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे.
यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापने (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम, 2017 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या कायद्यानुसार राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मनोरंजन केंद्रे आदी ठिकाणांतील कामाचे तास निश्चित होणार आहे. यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि त्रिपुरासारख्या राज्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातही ही सुधारणा लागू करण्यात आली आहे.
कारखाने अधिनियम १९४८ च्या कलम ६५ मध्ये सुधारणा केल्यामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा ९ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. या सुधारणांमुळे कारखान्यातील विश्रांतीसाठी सुट्टीचा कालावधी ५ तासानंतर ३० मिनिटे याऐवजी ६ तासापर्यंत ३० मिनिटे असा करण्यात आला आहे. तसेच आठवड्याच्या कामाचा कार्याचा विस्तार कालावधी साडेदहा तासांवरुन १२ तास करण्यात आला आहे.
याशिवाय अतिकालिक कामाच्या तासांची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही यावरुन १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात येणार आहे. अर्थात अतिकालिक कामासाठी कामगारांची लेखी संमती घेणे आवश्यक असेल, अशी तरतूद सुद्धा त्यात आहे. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील.
सरकारच्या मते, या निर्णयामुळे व्यवसाय करणे सोपे होईल, नवीन गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि त्याच वेळी ओव्हरटाइमसाठी दुप्पट वेतनासह कामगारांसाठी वेतन संरक्षण आणि सुधारित हक्क सुनिश्चित होतील अशी अपेक्षा आहे.





