भारतात उत्पादनवाढीसाठी पोषक वातावरण, खासगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा: अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली – भारत सरकारने जीएसटी आणि इतर क्षेत्रात महत्त्वाच्या सुधारणा अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचा फायदा घेऊन खासगी क्षेत्राने गुंतवणूक करून विस्तारीकरणाचे प्रकल्प हाती घ्यावेत असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
आता खासगी क्षेत्राने बचावात्मक राहण्याची गरज नाही तर त्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी इंडियन फाउंडेशन फॉर कॉलिटी मॅनेजमेंट या संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात बोलताना सांगितले. उद्योग क्षेत्राने फक्त अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्रालयाशी संपर्क न साता वर्षभर अर्थ मंत्रालयाच्या संपर्कात राहून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सूचना द्याव्यात. सरकार तरुणांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करत आहे. या कामाला उद्योग क्षेत्राने ही सहकार्य करावे.
सरकारने विकसित भारत करण्यासाठी जाणीवपूर्वक विविध क्षेत्रात सुधारणांची मोहीम हाती घेतली आहे. प्राप्तिकर आणि जीएसटी कर क्षेत्रात सुधारणा हाती घेतल्या आहेत. त्यामुळे आता भारतातील कर व्यवस्था विकसित देशातील कर व्यवस्थेसारखी झालेली आहे. थेट परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करण्याबरोबरच या क्षेत्रातील नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे असे त्या म्हणाल्या.
सर्व राज्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असलेला सर्व निधी केंद्र सरकार देईल. उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी आयटीआयचा कायापालट होत असल्याचं त्या म्हणाल्या. गेल्या दोन ते तीन अर्थसंकल्पांमध्ये नागरिकांच्या कौशल्य विकासासाठी सरकारनं तरतुदी केल्याचंही त्यांनी सांगितलं.





