Pakistan : भारतातून 89 हिंदू यात्रेकरू ‘या’ कारणासाठी पोहोचले पाकिस्तानात

लाहोर : पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील कटास राज मंदिरात (Katas Raj Temple in Pakistan) महाशिवरात्री साजरी करण्यासाठी भारतातील सुमारे 89 हिंदू यात्रेकरू मंगळवारी येथे (89 Indian Pilgrims Arrive In Pakistan To Celebrate Maha Shivaratri) दाखल झाले आहेत. त्यांच्या हातात जय श्रीराम लिहिलेले झेंडेही होते. त्यांनी याठिकाणी हर हर महादेवचा जयघोषही केला.
सुमारे 89 हिंदू यात्रेकरू मंगळवारी वाघा बॉर्डरमार्गे भारतातून येथे आले, असे पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या पवित्र स्थळांची देखभाल करणाऱ्या ईटीपीबीचे प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी सांगितले आहे. इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी राणा शाहिद आणि फराज अब्बास यांनी सीमेवर त्यांचे स्वागत केले.
चोख सुरक्षा व्यवस्था….
हाश्मी म्हणाले की, हिंदू यात्रेकरू लाहोरपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या चकवाल येथे जाण्यापूर्वी कटास राज येथे त्यांच्या धार्मिक उत्सवात सहभागी होण्यासाठी एक दिवस लाहोरमध्ये राहतील. गुरुवारी तेथे महाशिवरात्रीचा मुख्य कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू यात्रेकरूंचे नेते संजीव कुमार म्हणाले की, त्यांना पाकिस्तानमध्ये प्रेम मिळत आहे आणि ईटीपीबी त्यांच्या पवित्र स्थळांची चांगली काळजी घेत आहे.
श्री कटास राज मंदिर, ज्याला किला कटास असेही म्हणतात, हे अनेक हिंदू मंदिरांचे एक संकुल आहे, जे एका पायवाटांनी एकमेकांशी जोडलेले आहेत. मंदिर परिसर कटास नावाच्या तलावाने वेढलेला आहे ज्याला हिंदूं पवित्र मानतात. हा परिसर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोटोहर पठार भागात स्थित आहे.
कटास राज हे पाकिस्तानातील पंजाबच्या उत्तरेकडील नमक कोह पर्वत रांगेत असलेले हिंदूंचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. कटास राज मंदिर खटाना गुर्जर घराण्याने बांधले होते. येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. इथे आणखी काही मंदिरे आहेत. हे 10 व्या शतकात बांधले गेले असं सांगितल जाते.
मंदिराचा इतिहास….
इतिहास अभ्यासक आणि पुरातत्व विभागाच्या मते हे ठिकाण शिव नेत्र मानले जाते. माता पार्वती जेव्हा सती झाली तेव्हा भगवान शंकराच्या डोळ्यातून दोन अश्रू पडले. कटसवर एक अश्रू टपकला जिथे ते अमृत झाले.आजही महान सरोवर अमृत कुंड कटसराज तीर्थक्षेत्राच्या रूपात आहे. तर दुसरा अश्रू राजस्थानच्या अजमेरमध्ये वाहून गेला आणि तेथे पुष्करराज तीर्थक्षेत्र आहे.
इतिहास अभ्यासक आणि पुरातत्व विभागाच्या मते हे ठिकाण शिव नेत्र मानले जाते. माता पार्वती जेव्हा सती झाली तेव्हा भगवान शंकराच्या डोळ्यातून दोन अश्रू पडले. एक अश्रू कटास येथे पडला जिथे ते अमृत झाले. आजही महान सरोवर अमृत कुंड कटासराज तीर्थक्षेत्राच्या रूपात आहे. तर दुसरा अश्रू राजस्थानच्या अजमेरमध्ये पडला आणि तेथे पुष्करराज तीर्थक्षेत्र आहे.
महाभारत काळात पांडवांनी वनवासात या टेकड्यांमध्ये वास्तव्य केले होते, असेही मानले जाते. हे ते कुंड आहे जिथे पांडव तहानलेले असताना पाण्याच्या शोधात पोहोचले होते. या कुंडावर यक्षाचा अधिकार होता.








