भाजपच्या १४ पैकी ८ मुख्यमंत्र्यांना गमवावी लागली खुर्ची ! मोदी कालखंडात नव्या चेहऱ्यांना लागते पदाची लॉटरी

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले. या तीनही राज्यांत पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा दांडगा अनुभव असलेले नेते होते. त्या नेत्यांच्या नावाला त्यांच्या राज्यात मोठे वलय आहे. मात्र भाजप हायकमांडने त्यांना बाजूला सारत अगदी नव्या आणि पूर्णत: अनोळखी चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली.
राजस्थानात तर नेता निवडीच्या वेळी चिठ्ठी टाकून नेता निवडण्यात आल्याचे बोलले जाते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शेजारी बसलेल्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा चिठ्ठी पाहतानाच आणि त्यानंतर त्यांचा चेहरा कसा बदलत गेला याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मात्र याचा इन्कार करतात. आमची प्रत्येक कार्यकर्त्यावर नजर असते. भविष्यातील ३० वर्षांचा विचार करून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडला जातो असा दावा भाजपकडून केला गेला आहे. मात्र त्यात काही तथ्य असेलही किंवा नसेलही. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशाच्या राजकारणात उदय झाल्यानंतर भाजपचे राजकारण बरेच बदलले आहे.
मोदी यांच्या आतापर्यंतच्या काळात अनेक राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक धक्कादायक नावे पुढे आली. विशेष म्हणजे त्या लोकांना मुख्यमंत्री केलेही गेले. मात्र आपली खुर्ची सांभाळण्यात पुढे या लोकांना अपयशच आले. यातील काहींना केंद्रात बोलावण्यात आले, काहींना राज्यपाल करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले तर काहींची पक्षसंघटनेत पाठवणी करण्यात आली. पण मुख्यमंत्रिपदाचा लॉटरी त्यांना एकदाच लागली. पुढे या पदाने त्यांना हुलकावणीच दिली.
गुजरातपासून सुरूवात
१. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदावर बढती झाल्यावर गुजरातमध्ये त्यांचा उत्तराधिकारी म्हणून अनेक दिग्गज आणि अनुभवी नेते होते. मात्र मुख्यमंत्रिपदावर वर्णी लागली ती आनंदीबेन पटेल यांची. त्यांनी दोन वर्ष पद सांभाळले. त्यांच्यानंतर विजय रूपाणी मुख्यमंत्री झाले.
ते पदावर स्थिरस्थावर झाले; पण निवडणुकीच्या तोंडावर त्यांची उचलबांगडी करत त्यांना पक्षसंघटनेच्या कामात जुंपण्यात आले. अगदी निवडणुकीच्या तोंडावर भूपेंद्र पटेल यांची पदावर वर्णी लावली गेली आणि रूपाणी तेंव्हापासून राज्याच्या राजकारणातून बाहेरच गेले.
२. २०१४ मध्ये भाजपला झारखंडमध्ये सत्ता मिळाली. त्यावेळी अचानक रघुबर दास हा नवा चेहरा पुढे आणला गेला. अर्जुन मुंडा हे खरेतर मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार होते. त्यांना डावलण्यात आले आणि दास यांना संधी दिली गेली. तथापि, पुढच्या निवडणुकीत दास पक्षाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत आणि त्यांना राज्यपाल म्हणून ओडिशात पाठवण्यात आले. विशेष दास स्वत: विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
३. २०१४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाली. नितीन गडकरी, एकनाथ खडसे, विनोद तावडे आदी नेते स्पर्धेत होते. खरेतर गडकरी यांच्याकडेच सूत्रे जाणार अशी चर्चाही होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सूत्रे सोपवण्यात आली. पाच वर्षे ते मुख्यमंत्री राहीले, मात्र पक्षाला पुन्हा सत्तेत आणू शकले नाही. राज्यात आता युतीचे सरकार आहे. त्यात फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांची इच्छा नसताना त्यांना पद स्विकारायला लावल्याची चर्चा अधुनमधून होत असते.
४. २०१६ मध्ये आसाममध्ये सत्ता मिळाल्यावर सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र कामगिरी समाधानकारक झाली नसल्याचे कारण देत त्यांच्याऐवजी हिमंता बिस्व सरमा यांच्याकडे राज्य सोपवण्यात आले आणि सोनोवाल यांची दिल्लीला बदली करण्यात आली.
५. २०१७ मध्ये भाजपला उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळाला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचा उदय झाला आणि ते अजुनही पदावर आहेत. गोव्यात मनोहर पर्रिकर तर उत्तराखंडमध्ये तीर्थसिंह रावत मुख्यमंत्री झाले. उत्तराखंडमध्ये आणखी एक बदल करण्यात आला व अखेर आता पुष्कर धामी मुख्यमंत्री आहेत. पर्रिकरांना अगोदर केंद्रात पाठवण्यात आले. नंतर पुन्हा ते राज्यात आले आणि आता त्यांचे निधन झाले आहे.
६. त्रिपुरात अगोदर २०१८ मध्ये विप्लब देव यांना मुख्यमंत्री केले गेले आणि नंतर त्यांना हटवण्यात आले. आता माणिक साहा तेथील मुख्यमंत्री आहेत.





