क्वेट्टा – पाकिस्तानच्या बलुचिस्तानच्या विविध भागांमधून पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आठ नागरिकांना जबरदस्तीने बेपत्ता केले आहे. पंजगुर, मास्तुंग आणि खारानमध्ये अनेक तरुणांना ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे. पाकिस्तानी सैन्याने पहाटे १:४५ वाजता खारानच्या किल्ली हसनाबाद भागातील मस्कन कलाट येथील त्यांच्या घरावर छापा टाकून चार तरुणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून अपहरणे, न्यायबाह्य हत्या आणि छळात वाढ झाल्याचे बलुच याकजेहथी कमिटी या बलुचिस्तानमधील मानवी हक्क संघटनेने काल अधोरेखित केले. ह्यूमन राईट्स सिच्युएशन इन बलुचिस्तान या शीर्षकाच्या अहवालात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेल्या व्यापक गैरवर्तनांच्या नोंदी या मानवाधिकार संघटनेने केल्या आहेत. या अहवालात नमूद करण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, क्वेटा, केच आणि आवारनसह बलुचिस्तानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अपहरणांची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामध्ये पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सने मुख्य गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये २९ लोकांची हत्या झाल्याने न्याय्यबाह्य हत्याकांड अजूनही थांबलेले नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.