नेपाळच्या तुरूंगांमधून पलायन करणारे ७९ कैदी ताब्यात; भारतीय सुरक्षा दलांची कारवाई

नवी दिल्ली – नेपाळमध्ये नुकतीच हिंसक निदर्शने झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीचा फायदा उठवून तेथील तुरूंगांमधून अनेक कैद्यांनी पलायन केले. त्यातील ७९ कैद्यांना भारतीय सुरक्षा दलांनी सीमेलगत ताब्यात घेतले.
नेपाळमधील स्थिती चिघळल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली. त्या सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे (एसएसबी) जवान तैनात आहेत. त्या जवानांनी आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी नेपाळमधील तुरूंगांमधून पसार झालेल्या कैद्यांना सीमेलगत पकडले.
बिहारच्या हद्दीत सर्वांधिक ४३ कैद्यांना, तर उत्तरप्रदेशात २२ कैद्यांना पकडण्यात आले. उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे १२ आणि २ कैद्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये काही भारतीयांचाही समावेश आहे. भारतीय सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही परदेशी नागरिकही आहेत.
त्यामध्ये नायजेरियाच्या २ तर, ब्राझील आणि बांगलादेशच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. दरम्यान, पर्यटनासाठी गेलेले काही भारतीयही नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी एसएसबीने इमर्जन्सी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.





