सात हजार पोलिसांचा पुण्यात खडा पहारा; गणेशोत्सव काळात सुरक्षेवर भर

पुणे – शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडावा, या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात तगड पोलीस बंदोबस्त असेल. उत्सव काळात शहरभर तब्बल सात हजार पोलीस तैनात असतील. दरम्यान, गेल्या महिन्यात कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना पकडण्यात आले होते. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. विशेषत: मध्यभागात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील 5 हजार पोलीस कर्मचारी-अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, अन्य जिल्ह्यातील 1,300 पोलीस अंमलदार, जवळपास हजार होमगार्ड, सीआरपीएफच्या 5 तुकड्या आणि पोलीस मित्र असे बंदोबस्तात सहभागी असतील.
गुन्हे शाखा आणि विशेष शाखेची पथके शहरातील संवेदनशील ठिकाणे तसेच गर्दीच्या भागात साध्या वेशात गस्त घालणार आहेत. बॉंब शोधक नाशक पथकाकडून मध्यभागातील मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळाच्या परिसरात नियमित तपासणी करण्यात येणार आहे.
वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन शहराच्या मध्यवस्तीतील अरुंद रस्ते, वारंवार होणारी कोंडी रोखण्यासाठी वेगळा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
सीसीटीव्हींची नजर
मध्यभागातील प्रमुख मंडळांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, शहरभर सीसीटीव्हीद्वारे नजर असेल. गर्दीतील चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशात पोलीस कर्मचारी गस्तीवर असतील.
दोन दिवस मद्य विक्री बंद
गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीची दुकाने दि. 19 आणि दि.28 सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच दि.29 सप्टेंबर रोजी पुणे मनपा क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत, तसेच पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या गावांमध्ये मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
याशिवाय ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असेल, त्या-त्या ठिकाणी विसर्जन मिरवणुक मार्गावरील सर्व भागातील मद्य विक्रीची दुकाने विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकान चालकाविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे.





