अमेरिकेत २ वेगवेगळ्या गोळीबारात ७ ठार

वॉशिंग्टन – अमेरिकेत बर्मिंगहॅम येथे झालेल्या गोळीबाराच्या २ वेगवेगळ्या घटनांमध्ये ७ जण ठार झाले. बर्मिंगहॅममधील नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात चौघेजण ठार झाले, तर अन्य काही जण जखमी झाले.
तर याच शहरातील एका घराबाहेर झालेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे, असे अल्बामा येथील पोलिसांनी सांगितले.
नाईटक्लबमध्ये रात्री ११ वाजता गोळीबार झाल्याचे पोलिसांना समजले, असे बर्मिंगहॅमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या नाईटक्लबच्या शेजारच्या रस्त्यावर एक जण मृतावस्थेमध्ये आढळला.
तर नाटक्लबमध्ये २ महिला मृतावस्थेत आढळल्या. तर जखमी झालेल्या आणखी एकाला युनिव्हर्सिटी ऑफ अल्बामाच्या रुग्णालयात नेले गेले होते. मात्र तेथे त्याला मृत घोषित केले गेले.
गोळीबारात जखमी झालेल्या ९ जणांवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच हल्लेखोराने नाईटक्लबमध्ये हा गोळीबार केला असावा, असा तपासअधिकाऱ्यांना संशय आहे.
बर्मिंगहॅम शहराच्या अन्य भागात ५.२० वाजता अपघाताचे वृत्त समजले. अपघातग्रस्त कारवर जवळून गोळ्या झाडल्या गेल्याचे तपासात आढळून आले. या कारमध्ये एक पुरुष, एक महिला आणि ५ वर्षांचा एक लहान मुलगा होता.
हे सर्व या गोळीबारात ठार झाले. यांची ठरवून हत्या केली गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही प्रकरणांच्या तपासासाठी पोलिसांनी नागरिकांकडून सीसीटिव्हीचे फुटेज मागवून घेतले आहे.





